Jayant Patil on Maratha Reservation meeting : आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारनं बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल दांडी मारली. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. काल पुन्हा आरक्षणाच्या मथळ्याखाली बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, विधानपरिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते. तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडं २०६ आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचं काही कारण नाही, असं जयंत पाटील यांनी सुनावलं.