Rahul Gandhi on INDIA : केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर एकजुटीसाठी प्रयत्नशील असलेल्या देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज बेंगळुरू इथं पार पडली. बैठकीनंतर प्रमुख नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना विरोधकांच्या आघाडीचं नाव 'इंडिया' यावर सविस्तर विवेचन केलं. विरोधी आघाडीची लढाई विरोधक आणि भाजपमधील नाही. देशाचा आवाज दाबला जात आहे. ही देशाचा आवाज बुलंद राखण्यासाठीची लढाई आहे. त्यामुळंच आघाडीचं नाव 'इंडिया' असं ठेवण्यात आलं आहे. ही लढाई एनडीए आणि इंडियामध्ये आहे. नरेंद्र मोदी आणि इंडियामध्ये आहे. मोदींची विचारधारा आणि इंडियामध्ये आहे. जेव्हा कधी भारतासमोर कुणी उभा राहतो, तेव्हा विजय कोणाचा होतो, हे सांगण्याची गरज नाही, असं सूचक वक्तव्यही राहुल यांनी केलं.