Gautam Adani Scam : सौर ऊर्जेच्या कंत्राटांसाठी गौतम अदानी यांनी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेच्या वकिलांनी तिथल्या कोर्टात केला आहे. त्यावर देशात गदारोळ सुरू झाला आहे. राजधानी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांना घेरलं. 'अदानी यांनी अमेरिकन आणि भारतीय कायदा या दोन्ही मोडल्याचं आता अमेरिकेत स्पष्ट झालं आहे. त्यांच्यावर अमेरिकेत आरोप झाले आहेत. तरीही आपल्या देशात ते अजून खुलेपणानं फिरत आहेत. त्यांना आजच अटक झाली पाहिजे. मात्र नरेंद्र मोदी त्यांना अटक करू शकत नाहीत. कारण, मोदी स्वत: या अदानींच्या घोटाळ्यात गुंतले आहेत. अदानींना अटक करून चौकशी केल्यास शेवटचं नाव मोदींचंच येईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.