Uttam Jankar on Maharashtra Election Results : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यात सध्या संशयकल्लोळ सुरू आहे. खुद्द मतदारांनाही निकालावर संशय असल्यानं विरोधी महाविकास आघाडीनंही हा मुद्दा लावून धरला आहे. ईव्हीएममधील मतांच्या संख्येचा, प्रत्यक्ष मतदानाचा हिशेब लागत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावानं तर थेट निकालाविरोधात उठावच करण्याचा प्रयत्न केला. या गावानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळं या गावकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार हे स्वत: रविवारी तिथं गेले. त्यावेळी स्थानिक आमदार उत्तम जानकर यांनी निकालावर जोरदार टोलेबाजी केली. भाजपच्या आमदारांना अजूनही विश्वास बसत नाही की आपण कसे निवडून आलो? विधानसभेत काही लोक मला भेटले होते. आता गप्प बसा. तुम्ही निवडून आलाय ना, असं ते आम्हाला सांगत होते. पण आमदारकीपेक्षा आम्हाला लोकशाही महत्त्वाची आहे, असं उत्तम जानकर म्हणाले.