Raj Thackeray : दसऱ्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केलं. 'शमीच्या झाडावरची शस्त्रं योग्य वेळी काढायची असतात. पण आपण ऐनवेळी मतदानाचं शस्त्र झाडावर नेऊन ठेवतो आणि नंतर तक्रारी करत राहतो. यावेळी असं करू नका. बेसावध राहू नका. वचपा काढण्याची वेळ आलीय. शमीच्या झाडावरची शस्त्र बाहेर काढा आणि तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांचा वेध घ्या,’ असं आवाहन राज यांनी आज केलं. महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्षे लुटलं जातंय. पण आपण आपट्याची पानं वाटतोय. लुटणारे लुटून गेले. आपल्या हातात पानं सोडून काही राहत नाही. कारण आमचं लक्ष नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.