Uddhav Thackeray on Judiciary : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज पक्षाच्या मशाल चिन्हाचा उल्लेख असलेलं नवं प्रचारगीत रिलीज करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा सोहळा झाला. 'पारंपरिक गोंधळ प्रकारातलं हे गीत असून या माध्यमातून आई जगदंबेला आम्ही साकडं घालत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ लेखक, गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिलं असून राहुल रानडे यांनी संगीत दिलं आहे. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गीत गायलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या तिघांचंही कौतुक केलं व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे गीत पोहोचवण्याचं आवाहन जनतेला केलं.