Sandeep Kshirsagar on valmik karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळं राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराड हा १९ दिवसांपासून फरार आहे. त्याला अटक करून फाशी द्या आणि त्याचे आश्रयदाते असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संबोधित केलं. 'हा मोर्चा जातीपातीचा नाही. इथं सगळ्या समाजाचे लोक आहेत. खून झालेले संतोष देशमुख हे जातीच्या वादावर लढत नव्हते. ते एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले होते. त्यातून त्यांचा घात झाला. मी एक ओबीसी आमदार आहे आणि मी जातीपातीचा विचार न करता वाल्मिक कराडला आता टाका अशी मागणी करतोय, असं क्षीरसागर म्हणाले