Uddhav Thackeray Video : सिंधुदु्र्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत पडल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. राज्यातील विरोधी पक्षांच्या आघाडीनं सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. हा सगळा प्रकार कोट्यवधींच्या भ्रष्टाचारामुळं झाला आहे. या कारभाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते १ सप्टेंबरला हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया असा मार्च काढणार आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळ्याला अभिवादन करून तिथं सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, काँग्रेस नेते नाना पटोले हे देखील यावेळी उपस्थित होते. शिवपुतळा पडल्याचा निषेध करण्यासाठी सरकारविरोधात काढण्यात आलेला मोर्चा आज सिंधुदुर्गात काही भाजपवाल्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी हल्ला चढवला. शिवप्रेमींचा मोर्चा अडवणारे मोदी-शहांचे दलाल आणि शिवद्रोही आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.