Bhai Jagtap protest against Adani Video : हिंडनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाविरोधात राजकीय वातावरण तापलं आहे. गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संबंध असून त्यांच्या कृपाआशीर्वादामुळंच अदानींचा उद्योग बहरल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी-अदानींचे एकत्रित फोटोही झळकावले होते. अदानी यांच्या कथित घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ती केंद्रानं धुडकावून लावल्यामुळं काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज थेट मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर धडक देत तीव्र आंदोलन केलं. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. यावेळी मोदी-अदानी भाई भाई अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी भाई जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.