raj thackeray praises cartoonist s. d. phadnis : ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी नुकतंच वयाच्या शंभरीत पदार्पण केलं. त्या निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रसिद्ध व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण झालं. राज ठाकरे यांनी यावेळी शि. द. फडणीस यांच्या चित्रकलेचं वेगवेगळे दाखले देऊन कौतुक केलं. कलेबद्दल त्यांचा दृष्टिकोन निखळ आहे. त्याचं चित्र बघताना सोपं वाटतं, पण ते सोपं नाही. कुठलीही गोष्ट जी सोपी वाटते ती सोपी करून समोर आणणं ही सगळ्यात कठीण गोष्ट असते. एक शतक पाहिलेल्या माणसानं आयुष्यात काय काय पाहिलं असेल, स्वातंत्र्याच्या भारावलेल्या काळापासून ते सगळं विस्कटत चाललं आहे हे एका आयुष्यात बघितलेल्या माणसाला निखळ दृष्टिकोन ठेवणं खरंच अवघड आहे. पण तो सरांनी ठेवला आणि तो त्यांच्या कलेत दिसत राहिला हे सरांचं मोठेपण, असं राज ठाकरे म्हणाले. फडणीस सरांसारखा माणूस युरोपात जन्माला आला असता तर त्यांच्या नावावर कलादालन काढा असं सांगण्याची वेळच आली नसती, असंही राज म्हणाले.