Manoj Jarange Patil on Beed Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळं राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण सध्या ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख हत्येतील आरोपी आणि सूत्रधार वाल्मिक कराड हा १९ दिवसांपासून फरार आहे. त्याला अटक करून फाशी द्या आणि त्याचे आश्रयदाते असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाला आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी संबोधित केलं. 'माझ्यावर फुलं टाकणाऱ्यांना आत टाकलं. कमेंट करणाऱ्यांना आत टाकलं आणि आता खून करणारा यांना सापडत नाही असं कसं शक्य आहे, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. 'मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी मंत्र्यांना पोसू नका. नाहीतर अवघड होऊन जाईल. सत्ताधारी व विरोधी आमदारांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यांकडं जावं आणि जे कोणी आरोप आहेत त्यांना उचलून आता टाकावं, अशी मागणी करा. ह्यांना चिलटांना पकडणं काही कठीण नाही, असं जरांगे म्हणाले.