Jitendra Awhad on Amit Shah Comment : आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर करण्याची हल्ली फॅशन झाली आहे. इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर सातही जन्म स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उद्देशून संसदेत केलं होतं. त्यावरून सध्या देशभर गदारोळ उठला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शप)पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहा यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. डॉ. आंबेडकर यांनी आम्हाला नरकातून बाहेर काढलं. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना विसरणार नाही. आंबेडकरांचं नाव घेणं ही आमच्यासाठी फॅशन नाही तर तो आमच्या आंतरआत्म्याचा आवाज आहे, असं आव्हाड यांनी ठणकावलं.