Kaas Pathar Fencing Removed: सातारा जिल्ह्यातील कास पठारनं अखेर मोकळा श्वास घेतला आहे. येथील लोखंडी कुंपण हटवण्यात आलं असून संपूर्ण पठार गुरे चराईसाठी मोकळं झालं आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कास पठारावर विविध प्रकारची दुर्मिळ फुले येत असतात. या फुलांच्या संरक्षणाच्या नावाखाली इथं लोखंडी कुंपण घालण्यात आलं होतं, मात्र कुंपण घातल्यापासून फुलांची संख्या घटू लागली होती. कुंपणामुळं या परिसरात पाळीव प्राण्यांचा आणि वन जीवांचा वावर घटला होता. त्यांच्या शेणापासून मिळणारं खत आणि त्यांच्या पायातून फुलांचं होणारं परागीभवन थांबलं होतं. त्यामुळं फुलांचा बहर कमी झाला होता. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लोखंडी कुंपण काढण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.