मुंबईतील धारावी परिसरात एका मशिदीचे बेकायदा बांधकाम तोडण्यावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावानं कारवाईला विरोध करत मुंबई महापालिकेच्या वाहनाची तोडफोड केली. धारावीतील मेहबूब-ए-सुबानी मशिदीचं काही बांधकाम बेकायदा असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचं पथक आज सकाळी कारवाईसाठी तिथं पोहोचलं होतं. मात्र, या पाडकामाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला. मोठ्या संख्येनं जमलेल्या जमावानं महापालिकेच्या वाहनांवर दगडफेक करून त्याच्या काचाही फोडल्या. त्यामुळं तणाव निर्माण झाला. मुंबई महापालिकेनं आठ दिवसांसाठी ही कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा वाद शांत झाला.