Chhagan Bhujbal on New parliament inauguration ceremony : नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यातील धर्मकांडावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. ‘नव्या संसद भवनाची गरज होती मात्र, ज्या पद्धतीनं त्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा झाला, ते पाहून अतिशय वाईट वाटलं. स्वातंत्र्यानंतर झालेल्या संसदेच्या सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे, विचारांचे नेते एकत्र आले होते, मात्र काल धर्मकांड सुरू होतं. कुठूनतरी उघडेबंब लोक आणले होते, त्याच्या मध्ये एकटे पंतप्रधान दिसत होते. हे लोकतंत्र आहे की मनुतंत्र हेच कळत नाही, असा संताप भुजबळ यांनी व्यक्त केला. 'तुम्हाला विरोधी पक्षाचे लोक नको होते तर किमान तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते किंवा तुमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन कार्यक्रम करायचा होता. लोकशाहीच्या मंदिरात धर्माचं अवडंबर कशाला, असा प्रश्न त्यांनी केला.