Jayant Patil video : लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं. पवारांच्या पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकल्या असल्या तरी सातारा लोकसभा मतदारसंघातील पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. सातारा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. इथून पवारांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती. ते सहज निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. इथं पिपाणी या चिन्हामुळं फटका बसल्याचं जयंत पाटील म्हणाले. साताऱ्यात शशिकांत शिंदे ३२ हजार मतांनी पराभूत झाले. तर, पिपाणी या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराला ३७ हजार मतं मिळाली, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. पिपाणी आणि तुतारी यात मतदारांचा गोंधळ झाला. निवडणूक आयोगाला तक्रार करूनही काहीही पाऊल उचललं गेलं नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.