Rahul Gandhi on Adani - Modi : अदानी समूहावर झालेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांनंतर काँग्रेसनं मोदी व अदानी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी व मोदी यांचे विमानातील फोटो दाखवून खळबळ उडवून दिली होती. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. उलट सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधी यांच्यावर विदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याचे आरोप केले. त्या अनुषंगानं राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी सदस्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांना मी आधी लोकसभेत उत्तर देईन. खासदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. अदानी आणि मोदी यांचं नातं काय आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अदानी यांना संरक्षण क्षेत्राशी संबंधित विविध कंत्राटं का दिली जातायत, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.