Cracks on atal setu video : देशातील सर्वात मोठा सागरी पूल असलेला व या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड तथा अटल सेतूला अवघ्या सहा महिन्यात भेगा पडल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिलं. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं अटल सेतूच्या कामाच्या दर्जाबाबत व प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
'शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारनं १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरं भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव या प्रकल्पाला दिलं आहे, त्यांच्या नावानं भ्रष्टाचार करणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला.