Tansa Dam Thane : मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण बुधवारी मध्यरात्री पूर्ण क्षमतेने भरलं आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. त्यानंतर धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून ११०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सद्यस्थितीत धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.