Sanjay Raut attacks Amit Shah : उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नकली असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन केली होती. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. ठाकरे आणि पवारांचे पक्ष नकली असतील तर मग असली कोण आहे? ज्यांना (एकनाथ शिंदे) तुम्ही आमच्या पक्षातून फोडून स्वत:च्या चरणाशी बसवून ठेवलंय ते असली आहेत का? ज्यांच्यावर तुम्ही ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आणि ज्यांची जागा तुरुंगात आहे असं तुम्ही म्हणालात. त्यांनाच आता स्वत:सोबत घेतलंत ते अजित पवार असली आहेत का, असा थेट सवाल राऊत यांनी केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील मोदी-शहांची वक्तव्यं भीतीमुळं आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. या निवडणुकीत राज्यातील जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे हे त्यांना माहीत आहे, असा टोलाही राऊत यांनी मोदी-शहांना हाणला.