Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. अपक्षांना निवडून देऊ नका. निवडून आल्यावर ते कुठं जातील याचा पत्ता लागणार नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर तोफ डागली. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भूमिका असेल तर पंचाईत होईल. आपल्याला एकसंधपणं, ठामपणं आणि ताकदीनं उभं राहावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या कोणाचा प्रचार केला तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार असेल. बोटचेपी आणि अळमटळम भूमिका घेतली तर आपलं व्यक्तिमत्त्व तयार होणार नाही, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या भाषणाचा रोख काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडं होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.