'अरे हाय काय अन् नाय काय' असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या 'गेला माधव कुणीकडे' या खुमासदार नाटकाने अनेक वर्ष रसिकांचे मनोरंजन केले. या दोघांच्या अफलातून टायमिंगवर पब्लिक फुल टू फिदा झालं. या नाटकातील प्रशांत दामले यांचा 'अरे हाय काय अन् नाय काय' हा डायलाॅग आजही चांगलाच पाॅप्युलर आहे. सलग एक तपाहून अधिक काळ या नाटकाची लोकप्रियता वाढतच गेली. ७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. मध्यंतरी काही वर्षे या नाटकाने 'ब्रेक' घेतला खरा पण रसिकांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुन्हा हे धमाल नाटक रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे.