sanjay raut on ed : मनी लाँड्रिंग केल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रॉपर्टीवर ईडीनं केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. त्यांची प्रॉपर्टी पुन्हा एकदा खुली केली आहे. ईडीच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ही संधी साधत ईडी आणि मोदी-शहांवर हल्ला चढवला आहे. प्रफुल्ल पटेल आता मंत्री होणार असल्यानं मोदी-शहांनी इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल पटेलांना परत केली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. 'आम्ही कायदेशीर लढाई लढणार. आमच्याकडं प्रॉपर्टी नाही. ज्या घरात आम्ही राहत होतो ते घर आणि गावातील १० गुंठे जमीन जप्त केली. हे मनी लाँड्रिंगचे पैसे नव्हते. उलट प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप होते. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जे गेले त्यांच्यावरही हेच आरोप होते. पण सर्वांच्या मालमत्ता खुल्या झाल्या. जे राजकीय विरोधक आहेत, त्यांची प्रॉपर्टी अजून जप्त आहे. पण आम्ही घाबरत नाही. आमच्या अंगावरचे कपडे जप्त केले तरी आम्ही पक्षाशी, महाराष्ट्राशी आणि देशाशी बेईमानी करणार नाही, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.