bulawayo braves vs harare hurricanes : झिम्बाब्वेमध्ये जिम आफ्रो T10 लीग 2023 चा थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉबिन उथप्पाचा संघ हरारे हरिकेन्स आणि सिकंदर रझा संघ बुलावायो ब्रेव्हज यांच्यात झाला. हा सामना बुलावायो ब्रेव्ह्सने ४९ धावांनी जिंकला. सिकंदर रझाने अष्टपैलू कामगिरी करत ३० चेंडूत नाबाद ६२ धावा केल्या आणि ३ बळीही घेतले.
प्रथम फलंदाजी करताना बुलावायो ब्रेव्हसची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बेन मॅकडरमॉट १८ धावा करून बाद झाला. हरारे हरिकेन्सचा गोलंदाज टिनोटेंडा मापोसा चेंडूने कहर करत होता. त्याने अॅश्टन टर्नर (५) आणि रायन बर्ल (०) यांना बाद केले. तर ब्रँडन मावुताने थिसारा परेरा (४), टिमिसेन मारुमा (१२) आणि फराज अक्रम (०) यांना झटपट बाद केले.
यामुळे बुलावायो ब्रेव्हस संघाची अवस्था ७ षटकात ७ बाद ७८ धावा अशी झाली. मात्र, यानंतर कर्णधार सिकंदर रझाने डावाची सुत्रे हाती घेतली. रझाने ५ षटकार आणि ४ चौकार लगावत ३० षटकात ६२ धावा फटकावल्या. रझाच्या या खेळीच्या बळावरच ब्रेव्हजने १० षटकांत ९ बाद १२८ धावा केल्या.
१२८ धावांच्या प्रत्युत्तरात हरारे हरिकेन्सची सुरुवात संथ झाली. कारण तस्किन अहमदने अनुभवी भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पाला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. यानंतर डोनोव्हन फरेरा (२) पुढच्याच षटकात मिल्सच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन ७ धावांवर बाद झाला. ५ षटकात हरारेची अवस्था ३ बाद ३२ अशी होती. यानंतर मोहम्मद नबीने थोडाफार संघर्ष करत २२ धावा केल्या.
यानंतर इरफान पठाणने संघाला कसेबसे ७व्या षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली, मात्र दुसऱ्या टोकाला समित पटेल (३) पॅट्रिक डूलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुढच्याच षटकात पठाणही (१५) बाद झाला. याच्या पुढच्याच चेंडूवर रझाने ताशिंगा मुसेकिवालाही एलबीडब्ल्यू आऊट केले. अशाप्रकारे हरारे हरिकेन्सला निर्धारित षटकात ९ गडी बाद ७९ धावाच करता आल्या.
संबंधित बातम्या