पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अव्वल कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची विनेश फोगट आज (७ ऑगस्ट) अपात्र ठरली. विनेश फोगट आज महिलांच्या ५० किलो वजनी गटात अंतिम फेरीत खेळणार होती, मात्र त्याआधीच तिला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले.
आता उपांत्य फेरीत विनेशकडून पराभूत झालेली कुस्तीपटू तिच्या जागी अंतिम सामना खेळणार आहे.
भारताच्या विनेश फोगटने महिला कुस्तीच्या ५० किलो गटात विश्वविजेत्या सु साकी हिला पराभूत करून मोठा धक्का दिला होता. यानंतर विनेशने युक्रेनच्या ओक्सानाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मंगळवारी रात्री विनेशने उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, आता ती फायनल खेळू शकणार नाही.
विनेश फोगटच्या जागी क्यूबन कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन अंतिम फेरीत खेळणार असल्याची घोषणा आयओसीने केली आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत विनेशकडून पराभूत झालेली पैलवान आता अंतिम फेरीत खेळणार आहे.
फायनलमध्ये युस्नेलिस गुझमनचा सामना सारा ॲन हिल्डब्रँडशी होईल. हा अंतिम सामना आज रात्री उशिरा खेळला जाईल.
वजनाबाबतच्या नियमांनुसार कुस्तीपटूला ज्या दिवशी खेळायचे आहे, त्या दिवशी त्याचे वजन घेतले जाते. प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवसांत होतात, त्यामुळे अंतिम फेरी गाठणाऱ्या कुस्तीपटूंना दोन्ही दिवशी वजन करावे लागते.
कुस्तीपटूला वजन करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी दिला जातो. या काळात त्यांना हव्या तितक्या वेळा वजन करता येते. यावेळी कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार तर नाही ना, किंवा त्यांची नखं कापली आहेत की नाही याची तपासणी केली जाते. ज्या कुस्तीपटूंना सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घ्यावा लागतो, त्यांना वजन करण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी मिळतो. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियमांनुसार कुस्तीपटूचे वजन निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते.