मराठी बातम्या  /  क्रीडा  /  अखेर योगा 'खेळाडूंना' मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

अखेर योगा 'खेळाडूंना' मिळाला न्याय ! शिवछत्रपती पुरस्कारात योग क्रीडाप्रकाराचा समावेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 30, 2023 08:32 PM IST

Shiv Chhatrapati Awards : सरकारने योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे या मुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क,नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.

shiv Chhatrapati awards
shiv Chhatrapati awards

भारतीय संस्कृतीची ओळख जगाला पटवून देणाऱ्या योगविद्येचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र खेळांच्या यादीत व्हावा, या आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आलं आहे. आ. तांबे यांनी या मागणीसाठी गेल्या तीन अधिवेशनांमध्ये आणि त्यानंतरही सातत्याने पाठपुरावा केला होता. आता सरकारने शासन निर्णय लागू करत योगाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारपात्र खेळांच्या यादीत केला आहे. विशेष म्हणजे या मुळे योग खेळाडूंना ग्रेस मार्क, नोकरीत आरक्षण अशा विविध सरकारी योजनांचाही लाभ मिळणार आहे.

गेल्या तीन अधिवेशनापासून आमदार सत्यजीत तांबे यांनी योगासनांना क्रीडा प्रकाराचा दर्जा द्यावा व या खेळाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. हिवाळी अधिवेशनात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, ३१ डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासित केले होते. हा निर्णय झाल्यानंतर आ. सत्यजीत तांबे यांनी क्रीडामंत्री संजय बनसोड आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष आभार मानले.

राज्यातील खेळाडू, संघटक व कार्यकर्ते, मार्गदर्शक यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. परंतु, यात कुठेही योग क्रीडा प्रकाराचा समावेश नव्हता. भारतीय संस्कृतीत उगम झालेली योगविद्या ही निरोगी आयुष्यासाठी अत्यावश्यक आहे. योगविद्येचा अभ्यास करणाऱ्यांना शारीरिक फायद्यांसोबतच मानसिक स्वास्थ्यही लाभते. त्यामुळे योगासनांचा समावेश क्रीडा प्रकारांत व्हावा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबेंनी आमदार झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. 

WhatsApp channel

विभाग