Kapil Dev : मोठी बातमी! कपिल देव, गावसकरांसह दिग्गज क्रिकेटपटूंचा महिला कुस्तीपटूंना पाठिंबा, सरकारची कोंडी
Kapil Dev, Sunil Gavaskar backs Protesting Wrestlers : कपिल देव, सुनील गावसकर यांच्यासह भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनी महिला आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे.
1983 Cricket champion team backs protesting wrestlers : लैंगिक शोषणाच्या विरोधात न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंकडं केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं असलं तरी देशातून आंदोलकांना पाठिंबा वाढत आहे. भारतासाठी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील खेळाडूंनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारींवर केंद्रानं लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी या दिग्गज क्रिकेटपटूंनी केली आहे. त्यामुळं सरकारवर दबाव वाढला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कुस्तीपटूंसाठी आवाज उठवणाऱ्या या क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर, मदन लाल, कपिल देव, दिलीप वेंगसरकर आदींचा समावेश आहे. पदकविजेत्या कुस्तीपटूंसोबत पोलिसांनी ज्या पद्धतीनं गैरवर्तन केलं आहे, ते अस्वस्थ करणारं आहे. अत्यंत कष्टानं जिंकलेली पदकं गंगेत सोडण्याच्या निर्णयाप्रत त्यांना यावं लागणं हे वेदनादायी आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.
WTC : रोहित शर्माच्या फॉर्मकडे तूर्त दुर्लक्ष करा; संजय मांजरेकर असं का म्हणाला?
क्रिकेटपटूंनी आंदोलक कुस्तीपटूंनाही संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. 'घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील अशी आम्हाला आशा आहे. कायद्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं १९८३ च्या संघानं निवेदनात म्हटलं आहे.
'पदके गंगेत फेकून देण्याचा निर्णय हृदयद्रावक आहे. कारण पदक मिळवणं सोपं नसतं. या पदकांच्या मागे प्रचंड प्रयत्न, त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रम असतात. पदकं ही केवळ खेळाडूंचाच नाही तर देशाचाही अभिमान असतात. त्यामुळं खेळाडूंनी भावनेच्या भरात काही करू नये. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Ravindra Jadeja : ज्या बॅटनं विनिंग चौकार ठोकला ती बॅट जडेजानं गिफ्ट दिली, कोणाला ते जाणून घ्या
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. या संघात सुनील गावसकर, मोहिंदर अमरनाथ, के. श्रीकांत, सय्यद किरमाणी, यशपाल शर्मा, मदन लाल, बलविंदर सिंग संधू, संदीप पाटील, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी आणि रवी शास्त्री यांचा समावेश होता.
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर आहेत आरोप
भाजपचे खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्यावर महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक यांनी लैंगिक शोषणाचे व मानसिक छळाचे आरोप केले आहेत. बजरंग पुनिया यानंही असेच आरोप केले आहेत. बृजभूषण याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी हे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार कुठलीही कारवाई करत नाही. उलट कुस्तीपटूंवर पोलीस बळाचा वापर करून त्यांचं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.