गेल्या वर्षभरापासून भारतीय कुस्ती संघटना आणि खेळाडू यांच्यात वाद सुरू आहे. काही वरिष्ठ कुस्तीपटूंच्या विरोधानंतर कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना आपली खुर्ची सोडावी लागली. यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या, निवडणूकीत संजय सिंह हे निवडून आले आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनले. पण कुस्तीपटूंचा संजय सिंह यांनाही विरोध झाला.
संजय सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती घेतली. तर बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी त्यांचे पद्मश्री पुरस्कार परत केले. यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ बरखास्त केला असून एक अॅडहॉक कमिटी संघटनेचे काम पाहत आहे.
पण आज (३ जानेवारी) अचानक कुस्तीपटू आंदोलकांच्या विरोधात इतर शेकडो कुस्तीपटूंचे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू झाले. या आंदोलकांनी विनेश, बजरंग आणि साक्षी मलिक यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
आज आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी सांगितले की, हा विरोध कुस्ती संघटना किंवा त्यांच्या अधिकार्यांचा नसून बजरंग, साक्षी आणि विनेश फोगट यांचा आहे. बजरंग, साक्षी आणि विनेश यांच्यामुळे आम्ही आमचे महत्वपूर्ण वर्ष गमावले आहे.
दरम्यान, यानंतर आज साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. ब्रिजभूषण शरण सिंग यांचा विश्वासू संजय सिंह यांना जर बाजूला केले, तर त्यांना नव्या कुस्ती संघटनेबाबत कसलाच आक्षेप नाही. त्यांचा विरोध केवळ संजय सिंह यांना आहे.
सोबतच साक्षीने या पत्रकार परिषदेत दावा केला आहे, की तिच्या आईला WFI चे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्या समर्थकांकडून धमकीचे फोन येत आहेत.
साक्षी म्हणाली, ‘गेल्या २-३ दिवसांपासून ब्रिजभूषणचे गुंड अॅक्टिव्ह झाले आहेत. माझ्या आईला धमकीचे फोन येत आहेत. माझ्या घरातील कोणावर तरी गुन्हा दाखल होईल, असे ते लोक फोन करून सांगत आहेत. सोशल मीडियावर लोक आम्हाला शिव्या देत आहेत पण त्यांनी हे विसरता कामा नये की त्यांच्याही घरी बहिणी आणि मुली आहेत’.
साक्षी मलिकने पुढे सांगितले की, 'आम्हाला नवीन महासंघाबाबत कोणतीही अडचण नाही. संजय सिंह या एकाच व्यक्तीच्या उपस्थितीमुळे अडचण निर्माण झाली आहे. संजय सिंह यांच्याशिवाय आम्हाला नव्या महासंघासोबत किंवा अॅडहॉक समितीबाबतही काही हरकत नाही.
सरकार आमच्यासाठी पालकासारखे आहे आणि मी त्यांना विनंती करते की आगामी कुस्तीगीरांसाठी कुस्ती सुरक्षित करावी. संजय सिंह कसे वागतात ते तुम्ही पाहिले आहे. त्यांचा महासंघात हस्तक्षेप आम्हाला नको आहे'.
साक्षी पुढे म्हणाली, ‘मी फक्त विनंती करू शकते. डब्ल्यूएफआय निवडणुकीनंतर ब्रिजभूषण सिंह यांनी सत्तेचा कसा दुरुपयोग केला हे सर्वांनी पाहिले. कोणालाही न विचारता त्यांनी आपल्या शहरात ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप आयोजित करण्याची घोषणा केली’.