पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय कुस्तीपटूंच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर आता महिला कुस्तीपटू अंतिम पांघल चर्चेत आली आहे.
युवा कुस्तीपटू अंतिम पांघल आणि तिच्या बहिणीला पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. वास्तविक, अंतिम पांघल हिने ऑलिम्पिक व्हिलेजमधून आपले वैयक्तिक सामान गोळा करण्यासाठी तिच्या लहान बहिणीला तिचे अधिकृत ओळखपत्र दिले होते. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला पकडले.
अंतिम पांघलने महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना गमावला आणि स्पर्धेतून पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. यानंतर ती थेट तिचे प्रशिक्षक भगतसिंग, विकास भारद्वाज आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथे गेली.
यानंतर अंतिमने तिच्या बहिणीला ऑलिम्पिक व्हिलेजमधून जाऊन सामान आणायला सांगितले. तिची बहीण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली पण बाहेर पडताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला पकडले.
तिचे बयाण नोंदवण्यासाठी तिला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि अंतिम पांघला हिलाही जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावले. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या सुटकेसाठी काही तास लागले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हे प्रकरण येथेच थांबत नाही तर अंतिमचे प्रशिक्ष विकास आणि भगत हे मद्यधुंद अवस्थेत कॅबमध्ये प्रवास करताना आढळले आणि ते कॅब चालकास भाडे देण्यासही नकार देत होते, त्यानंतर चालकाने पोलिसांना बोलावले.
दरम्यान, आता या सर्व प्रकरणाबाबत आयओएने कुस्ती महासंघाला अंतिम पांघल आणि सपोर्ट स्टाफवर शिस्तभंगाची कारवाई करण्यास सांगितले आहे.