मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WPL Final : मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स… कोण जिंकणार महिला प्रीमियर लीग? कोणता संघ मजबूत? पाहा

WPL Final : मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स… कोण जिंकणार महिला प्रीमियर लीग? कोणता संघ मजबूत? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 25, 2023 05:50 PM IST

Delhi Capitals vs Mumbai Indians WPL final : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (MI VS DC) यांच्यात होणार आहे. रविवारी (२६ मार्च) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे.

Delhi Capitals vs Mumbai Indians wpl final
Delhi Capitals vs Mumbai Indians wpl final

dc vs mi WPL 2023 Final : महिला प्रीमियर लीगचा (WPL 2023) थरार अंतिम टप्प्यात आला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सीझनचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI VS DC WPL FINAL) यांच्यात (२६ मार्च) रविवारी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. गट फेरीत दोन्ही संघांनी ६-६ सामने जिंकले होते आणि एकमेकांना एकदा पराभूत केले होते.

या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने शानदार सुरुवात केली होती. त्यांची कर्णधार हरमनप्रीत कौरने या स्पर्धेतले पहिले अर्धशतक ठोकले होते. मात्र, त्यानंतर ती आऊट ऑफ फॉर्म झाली. गेल्या काही सामन्यांमध्ये ती सपशेल अपयशी ठरली आहे. मात्र, त्यांच्याकडचे हीली मॅथ्यूज, नॅट सीव्हर ब्रंट आणि अमेलिया कर हे खेळाडून चांगल्या लयीत आहेत.

तर ऑस्ट्रेलियाची आणि दिल्लीची अनुभवी कर्णधार मेग लॅनिंगने आतापर्यंत या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. तिच्या कडे ऑरेंज कॅप आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने या स्पर्धेत हळूहळू वेग पकडला आणि मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थानावरून दूर केले. दिल्लीसाठी लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मारिजन कॅप यांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मात्र, असे असूनही मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांना जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जाऊ शकत नाही. दोन्ही संघांची कामगिरी पाहता विजेतेपदाचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. साखळी फेरीत दिल्ली आणि मुंबईने एकमेकांविरुद्ध मोठे विजय नोंदवले होते. या दोन्ही संघांनी लीग टप्प्यात समान १२ गुण मिळवले होते. परंतु दिल्लीचा संघ नेटरनरेटच्या आधारावर अव्वल स्थानावर राहिला.

मुंबईची गोलंदाजी चांगली

मुंबईसाठी आतापर्यंत सीव्हर ब्रंटने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत २७२ धावा करण्यासोबतच तिने १० विकेट्सही घेतल्या आहेत. मुंबईकडे हेली मॅथ्यूजसह आणखी एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे. मॅथ्यूजने आतापर्यंत २५८ धावा १३ बळी घेतले आहेत.

याशिवाय यास्तिका भाटियाने फलंदाजीत आक्रमक वृत्ती दाखवली आहे. मुंबईच्या गोलंदाजीचा विचार केला तर सायका इशाकने १५ विकेट घेऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे. याशिवाय त्यांच्याकडे इस्सी वोंग (१३ बळी) आणि अमेलिया केर (१२) सारखे उपयुक्त गोलंदाज आहेत.

लॅनिंगजवळ ऑरेंज कॅप

दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग आणखी एक ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तिच्याकडे WPL चे पहिले जेतेपद जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेत विक्रमी पाचव्यांदा T20 विश्वचषक जिंकला.

मेग लॅनिंगने WPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३१० धावा फटकावल्या आहेत. मारिजन कॅप आणि एलिस कॅप्सीनेही दिल्लीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यांना विजेतेपद मिळवायचे असेल, तर जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, शिखा पांडे आणि राधा यादव या भारतीय खेळाडूंनाही चांगली कामगिरी करावी लागेल.

दोन्ही संघ

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, टायटस साधू, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तान्या भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव , जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल.

मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), नाट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, कोमल जंजाड, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, जिंतामणी कलिता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या