मराठमोठ्या साईनाथ पारधी याने इतिहास रचला आहे. त्याने जॉर्डन येथे झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५१ किलो ग्रीको-रोमन गटात कांस्यपदक जिंकले.
साईनाथने कांस्यपदकाच्या सामन्यात कझाकिस्तानच्या येरासिल मुसानचा ३-१ असा पराभव करून इतिहास रचला. साईनाथने रिपेचेज फेरीत अमेरिकेच्या मुनारेटो डॉमिनिक मायकेलचा ७-१ असा पराभव करून पदकाच्या लढतीत प्रवेश केला होता.
साईनथा पारधी हा मुळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोऱ्हे या गावचा रहिवासी आहे. त्याने भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले.
- २०२२च्या राष्ट्रीय १५ वर्षांखालील फेडरेशन कपमध्ये तिसरा
- २०२२च्याच राष्ट्रीय ग्रँड प्रिक्स स्पर्धेत तिसरा
- २०२४च्या राष्ट्रीय १५ वर्षांखालील कॅडेट स्पर्धेत विजेता
- २०२४च्या राष्ट्रीय १७ वर्षांखालील कॅडेट स्पर्धेत तिसरा
- २०२४च्या आशियाई १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी निवड
दरम्यान, साईनाथने कांस्यपदक जिंकल्यानंतर गुरुवारी भारताच्या ४ पैलवानांनी सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय महिला कुस्तीपटू आदिती कुमारी (४३ किलो), नेहा (५७ किलो), पुलकित (६५ किलो) आणि मानसी लाथेर (७३ किलो) यांनी गुरुवारी (२२ ऑगस्ट) चमकदार कामगिरी केली आणि आपापल्या श्रेणींमध्ये सुवर्णपदक जिंकून अंडर-१७ वर्ल्ड चॅम्पियन बनले.
याशिवाय काजल (६९ किलो) आणि श्रुतिका शिवाजी पाटील (४६ किलो) यांनीही अंतिम फेरीत धडक मारून पदके जिंकली. आज शुक्रवारी त्यांचे अंतिम सामने होणार आहेत.
या चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी पदके मिळू शकतात. राज बाला (४० किलो) कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये खेळणार आहे, तर मुस्कान (५३ किलो) आणि रंजिता (६१ किलो) यांनाही रेपेचेज फेरीतून कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.
अदिती कुमारीने विजेतेपदाच्या लढतीत ग्रीसच्या मारिया लुईझा गिकिकाचा ७-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी नेहा सांगवानने अंतिम फेरीत जपानच्या सो सुत्सुईचा पराभव केला. सुवर्णपदकाच्या लढतीत नेहाने प्रतिस्पर्ध्याला एकही संधी दिली नाही.
पुलकितने तटस्थ ऍथलीट म्हणून स्पर्धा करत डारिया फ्रोलोवावर ६-३ असा विजय मिळवला. ती ५-० ने आघाडीवर होती, परंतु सामन्याच्या शेवटी तिने 'पुशआउट पॉइंट' आणि सावधगिरीचा वापर केला, ज्यामुळे फ्रोलोव्हाला ३ गुण मिळविण्याची संधी मिळाली. फ्रोलोव्हाने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु पुलकितने शेवटच्या २० सेकंदात चांगला बचाव करत जेतेपदावर कब्जा केला.
मानसीने अंतिम फेरीत हन्ना पिरस्काया हिचा ५-० असा पराभव केला. याआधी भारताने ग्रीको-रोमन शैलीत रौनक दहिया आणि साईनाथ यांचा समावेश असलेल्या दोन कांस्यपदकेही जिंकली होती.