मराठी बातम्या  /  क्रीडा  /  निखत झरीनचा सोनेरी ठोसा; महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास

निखत झरीनचा सोनेरी ठोसा; महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 19, 2022 10:36 PM IST

महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारताच्या निखत झरीन हिनं आणखी एका यशाला गवसणी घातली आहे.

निखत झरीन
निखत झरीन (HT_PRINT)

महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत (Women’s Boxing World Championships)  भारतीय बॉक्सर निखत झरीनने (Nikhat Zareen) अंतिम सामना जिंकून इतिहास घडवला आहे. ५२ किलो वजनी गटात तिने थायलंडच्या जुटामास जितपोंगवर एकतर्फी विजय मिळवला. निखतने  ५-० ने सामना जिंकला. या विजयासह तिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

उपांत्य फेरीतील सामन्यातही निखतनं असाच एकतर्फी विजय मिळवला होता. त्या सामन्यात निखतनं ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिला ५-० नं पराभवाची धूळ चारली. वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यावेळी फायनलला धडक मारलेली ती एकमेव भारतीय बॉक्सर होती. भारतीय बॉक्सर मनीषा मौन (५७ किलो) हिला टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती इटलीच्या इरमा टेस्टा हिच्याकडून ५-० नं पराभव पत्करावा लागला, तर परवीन हुड्डा (६३ किलो) हिला आयर्लंडच्या एमी ब्रॉडहर्स्टने ४-१ च्या फरकानं पराभूत केलं.

निखतनं या कामगिरीमुळं मेरी कोमच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. मेरी कोम हिनं तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आहे. तर, सरिता देवी, जेनी आर एल आणि लेखा सी यांनीही याआधी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद मिळवलं आहे. आता या यादीत निखत झरीनचा समावेश झाला आहे. निखतनं यापूर्वी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पिनयशिपमध्येही विजेतेपद पटकावलं होतं.

WhatsApp channel