मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WIPL Auction : चॅम्पियन संघाला ६ कोटी तर... महिला आयपीएलबाबत या गोष्टी माहीत आहेत का? पाहा

WIPL Auction : चॅम्पियन संघाला ६ कोटी तर... महिला आयपीएलबाबत या गोष्टी माहीत आहेत का? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2023 02:45 PM IST

WIPL Teams Auction : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु एका रिपोर्ट्नुसार, ही स्पर्धा यावर्षी ४ ते २६ मार्च दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. त्याआधी महिला आयपीएलसाठी खेळाडू आणि संघांचा लिलावही होणार आहे.

WIPL Auction
WIPL Auction

womens IPL prize money : महिला इंडियन प्रीमियर लीग (WIPL) चा पहिला हंगाम लवकरच येत आहे. त्यासाठी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये लिलाव होणार आहे. यादरम्यान महिलांच्या आयपीएलमध्येही पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे पैशांचा पाऊस पडणार आहे. महिला खेळाडूही आता श्रीमंत होणार आहेत. पण ही स्पर्धा पुरुषांच्या आयपीएलपेक्षा वेगळी असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु एका रिपोर्ट्नुसार, ही स्पर्धा यावर्षी ४ ते २६ मार्च दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. त्याआधी महिला आयपीएलसाठी खेळाडू आणि संघांचा लिलावही होणार आहे.

पहिल्या मोसमात महिला आयपीएलमधील खेळाडूंची पर्स १२ कोटी रुपये असेल. दरवर्षी त्यात हळूहळू वाढ होईल, जी ५ वर्षांनंतर म्हणेजच २०२७ पर्यंत १८ कोटी रुपये होईल. दुसऱ्या मोसमात खेळाडूंची पर्स १२ कोटींवरून १३.५ कोटींपर्यंत वाढणार आहे.

महिला आयपीएलचे नियम

पुरुषांच्या आयपीएलमध्ये १० संघ आहेत, तर महिला आयपीएलच्या पहिल्या ३ मोसमात केवळ ५ संघ असतील. यानंतर त्यात एका संघाची एंट्री होणार आहे. त्यानंतर एकूण ६ संघ असतील.

पुरुषांच्या आयपीएलमध्ये प्लेइंग-११ मध्ये केवळ ४ परदेशी असू शकतात. तर महिलांच्या आयपीएलमध्ये ५ विदेशी खेळाडूंना प्लेइंग-११ मध्ये संधी दिली जाणार आहे.

महिला आयपीएलमध्ये प्लेइंग-११ मध्ये खेळणाऱ्या ५ परदेशी खेळाडूंपैकी एक असोसिएट देश खेळाडू असेल, असाही नियम आहे.

चॅम्पियन संघाला ६ कोटी रुपये मिळणार

पहिल्या सत्रात २२ सामने होण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.

महिला आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी १० कोटी रुपये बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. चॅम्पियन संघाला ६ कोटी आणि उपविजेत्या संघाला ३ कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संघाला १ कोटी रुपये दिले जातील.

महिला आयपीएल (WIPL) च्या ५ संघांचा लिलाव बुधवारी होणार आहे, ज्यामधून बीसीसीआयला किमान ४ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, संघांच्या बंद लिलावात प्रत्येक संघ ५०० ते ६०० कोटी रुपयांना विकला जाण्याची शक्यता आहे. अदानी ग्रुप, टोरेंट ग्रुप, हल्दीराम प्रभुजी, कॅप्री ग्लोबल, कोटक आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांनीही संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

WhatsApp channel