मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WNCL FINAL : थरारक सामना कसा असतो ते पाहा! शेवटच्या षटकात ५ विकेट पडल्या अन् जिंकलेला संघ हरला

WNCL FINAL : थरारक सामना कसा असतो ते पाहा! शेवटच्या षटकात ५ विकेट पडल्या अन् जिंकलेला संघ हरला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 26, 2023 12:38 PM IST

tasmania women vs south australian scorpions WNCL FINAL : ऑस्ट्रेलियात एका देशांतर्गत स्पर्धेत अप्रतिम सामना पाहायला मिळाला. अंतिम सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. शेवटच्या षटकात पाच विकेट पडल्या, त्यामुळे सामना सहज जिंकेल असे वाटणाऱ्या संघाने सामना गमावला.

WNCL FINAL
WNCL FINAL

ऑस्ट्रेलियातील एका देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खूपच चर्चेत आला आहे. या सामन्याने थरारकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अखेरच्या षटकात एक चमत्कार घडला आहे, हे पाहून क्रिकेट रसिकांना हे नेमकं काय आणि कसं घडलं? यावर विश्वास करणे कठिण जात आहे. या थरारक सामन्याच्या शेवटच्या षटकात ५ विकेट पडल्या आणि सामना सहज जिंकेल असं वाटणाऱ्या संघाने सामना गमावला.

ऑस्ट्रेलियाच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग (WNCL) चा अंतिम सामना शनिवारी (२५ फेब्रुवारी) तस्मानिया वुमेन्स आणि दक्षिण ऑस्ट्रेलियन स्कॉर्पियन्स यांच्यात झाला. या सामन्यात पावसाने अडथळा आणला. अशा परिस्थितीत हा सामना मध्येच थांबवावा लागला, त्यामुळे काही षटकेही कमी करण्यात आली.

तस्मानिया वुमेन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. एलिसा विलानीने संघासाठी ११० धावांची खेळी केली. तिच्याशिवाय नाओमी स्टेनबर्गनेही ७५ धावा केल्या. या दोघींच्या बळावर संघाने एकूण २६४ धावा केल्या. आता दक्षिण ऑस्ट्रेलियन स्कॉर्पियन्सच्या फलंदाजी दरम्यान पाऊस आला त्यामुळे टार्गेट कमी करण्यात आले.

स्कॉर्पियन्सला ४७ षटकात २४३ धावांचे नवे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात संघाला केवळ २४२ धावाच करता आल्या. एकेकाळी हा संघ सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण डावाच्या शेवटच्या षटकात काय झाले हे कोणालाच समजले नाही. शेवटच्या षटकात ५ विकेट पडल्या.

दक्षिण ऑस्ट्रेलियन स्कॉर्पियन्सच्या डावाची ४६ षटके पूर्ण झाली तेव्हा त्यांची धावसंख्या २३९/५ अशी होती. शेवटच्या षटकात विजयासाठी ४ धावा करायच्या होत्या आणि विजय निश्चित असल्याचे दिसत होते, परंतु संघाला केवळ दोनच धावा करता आल्या आणि त्यांनी ५ विकेट गमावल्या. सारा कोयटेने तस्मानियासाठी शेवटचे षटक केले आणि ती संघाची हिरो ठरली. अशा स्थितीत तस्मानिया महिला संघाने अवघ्या एका धावेने विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले.

४७व्या षटकात काय घडले?

४६.१ : अॅनी ओ'निल- क्लीन बोल्ड

• ४६.२ : १ धाव

• ४६.३ : जेम्मा बार्सबी- यष्टीचीत

• ४६.४ : अमांडा जेड वेलिंग्टन- धावबाद

• ४६.५ : एला विल्सन - एलबीडब्ल्यू आऊट

• ४६.६ : अनेसू मुश्गेनवे- धावबाद

अंतिम स्कोअरबोर्ड

तस्मानिया महिला - २६४/१०, (५० षटके)

दक्षिण ऑस्ट्रेलिया स्कॉर्पियन्स - २४१/१० , (४७ षटके)

WhatsApp channel