Wimbledon Final 2023 : स्पेनच्या कार्लोस अल्काराझने इतिहास रचला आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला (Wimbledon final Carlos Alcaraz Vs Novak Djokovic) धुळ चारून तो विम्बल्डन 2023 चा चॅम्पियन बनला आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अल्काराझने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ६-१, ६-७(६), १-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. या विजयासह अल्काराझ हा विम्बल्डन जिंकणारा स्पेनचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
याआधी सांतानाने १९६६ मध्ये तर २००८ आणि २०१० मध्ये राफेल नदालने विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. तब्बल १२ वर्षांनंतर स्पेनच्या एका खेळाडूने हे ग्रँडस्लॅम जिंकले आहे. अल्काराझचे हे दुसरे ग्रँडस्लॅम आहे. यापूर्वी त्याने २०२२ मध्ये यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
यूएस ओपनचे विजेतेपद जिंकून अल्कारेझ जगातील नंबर १ पुरुष टेनिसपटू बनला. पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तो आतापर्यंतचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
कार्लोस अल्कारेझचा जन्म ५ मे २००३ रोजी स्पेनमधील एल पालमार मर्सिया येथे झाला. तो वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळत आहे. त्याचे वडील कार्लोस अल्कारेझ गोन्झालेझ हे देखील टेनिसपटू होते. वडिलांना पाहूनच अल्कारेझने टेनिस कोर्टवर पाऊल ठेवले.
वयाच्या १५ व्या वर्षी, २०१८मध्ये अल्कारेझ एक व्यावसायिक खेळाडू बनला. फ्युचर चॅलेंजर्स स्पर्धेतून त्याने प्रोफेशनल टेनिसमध्ये पदार्पण केले. अल्कारेझने २०२१ मध्ये क्रोएशिया ओपनमध्ये रिचर्ड गॅस्केटचा पराभव करून पहिले एटीपी विजेतेपद जिंकले.
यानंतर कार्लोस अल्कारेझने २०२२ मध्ये मॅड्रिड ओपनच्या उपांत्य फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव केला होता. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालला धुळ चारली होती. एका दिवसाच्या फरकात त्याने नदाल आणि जोकोविचचा पराभव केला होता.
अल्कारेझने यूएस ओपनपूर्वी रिओ ओपन, मियामी ओपन, बार्सिलोना ओपन आणि माद्रिद ओपन जिंकले आहे. रिओ, मियामी आणि मॅड्रिड ओपन जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
विम्बल्डन फायनलमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त टक्कर झाली. पहिल्या सेटमध्ये ३६ वर्षीय जोकोविचने ६-१ असा विजय मिळवला. यानंतर अल्काराझने दुसऱ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. एका टप्प्यावर सेट ६-६ असा बरोबरीत होता. त्यानंतर टायब्रेकर झाला, जो अल्काराझने ८-६ ने जिंकून सेट ७-७ ने जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही २० वर्षीय स्पॅनिश अल्कारेझने जबरदस्त खेळ दाखवत जोकोविचचा ६-१ असा पराभव केला. यानंतर जोकोविचने चौथ्या सेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले.
यानंतर चौथा सेट जोकोविचने ६-३ असा जिंकला. या सेटमध्ये एका वेळी जोकोविच २-० ने पिछाडीवर होता. यानंतर त्याने पुनरागमन केले. मात्र, पाचव्या आणि अंतिम सेटमध्ये अल्काराझने आपली सर्वोत्तम कामगिरी करत ६-४ असा विजय मिळवला.
जोकोविचने फायनल जिंकली असती तर हे त्याचे २४ वे ग्रँडस्लॅम ठरले असते आणि त्याने मार्गारेट कोर्टच्या पुरुष आणि महिलांमध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली असती. तसेच जोकोविचचे हे एकूण आठवे आणि सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद ठरले असते. मात्र, यापैकी काहीही होऊ शकले नाही.
संबंधित बातम्या