विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय कार्लोस अल्काराझने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कार्लोस अल्काराझने अंतिम सामन्यात सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ सेटमध्ये ६-२,६-२,७-६ असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदावर काम कोरले तर जोकोविच सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे.
कार्लोस अल्काराझने दमदार कामगिरी करत सात वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. पहिल्या दोन सेटमध्ये सेंटर कोर्टवर एकतर्फी लढत झाली आणि जोकोविचने तिसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली आणि चार चॅम्पियनशिप गुण वाचवून टायब्रेक निश्चित केला; मात्र, अल्काराझने आपली लय कायम ठेवत ६-२, ६-२, ७-६ असा विजय मिळवत चौथ्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
३७ वर्षीय नोव्हाक जोकोविचने विजेतेपद पटकावले असते तर त्याने इतिहासात स्वत:चे नाव कोरले असते. या सामन्यात जोकोविचला महिला व पुरुष गटात सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे जिंकणारा खेळाडू बनण्याची संधी होती. मात्र कार्लोस अल्काराझने दमदार खेळ करत सुरुवातीपासून सामन्यावर पकड निर्माण करत नोव्हाक जोकोविचचे स्वप्न भंग केले.
या पराभवानंतरही जोकोविचने म्हटले की, २०२४ च्या स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी समाधानी आहे. विशेषत: गेल्या महिन्यात त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. जोकोविचला २०२४ च्या फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्याच दिवशी (५ जून) त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याने लक्षणीय सुधारणा करून विम्बल्डनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
जोकोविच म्हणाला विम्बल्डन ही माझी लहानपणापासूनची ड्रीम स्पर्धा होती. इथे असण्याची भावना किती वास्तववादी आहे, याची आठवण करून देण्याचा मी प्रयत्न करतो. मी अनेकवेळा खेळलो आहे, मी १० वेळा ट्रॉफीसाठी लढलो आहे, पण प्रत्येक वेळी जेव्हा मी कोर्टवर पाऊल ठेवतो, तेव्हा पहिल्यांदाच असे वाटते.
सलग दोन वेळा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या खेळाडूला पराभूत करणाऱ्या कार्लोस अल्काराझ या युवा खेळाडूचे जोकोविचने कौतुक केले. अल्काराज हा 'योग्य विजेता' असल्याचे या महान टेनिसपटूने ठामपणे सांगितले आणि या यशाबद्दल त्याच्या कुटुंबाचे आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले.
संबंधित बातम्या