भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनची पहिल्या सामन्यातील सर्व मेहनत वाया गेली आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील त्याचा पहिला विजय अमान्य ठरवला गेला आहे. लक्ष्य सेनने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताच्या इतर खेळाडूंचे मनोबल उंचावले होते, मात्र आता त्याचा विजय 'अवैध' ठरल्याने त्याच्यासह अनेक भारतीय खेळाडूंचे मनोबल खचू शकते.
पण लक्ष्य सेनचा विजय 'अवैध' का ठरवला गेला? यामागील कारण आणि नियम जाणून घेऊया.
वास्तविक, शनिवारी (२७ जुलै) झालेल्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा पराभव केला होता. या सामन्यात लक्ष्यने केविनवर २१-८ आणि २२-२० असा विजय मिळवला. लक्ष्य बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या गट-एलमध्ये आहे. या गटात लक्ष्यासह एकूण ४ खेळाडू होते. लक्ष्य सेनविरुद्ध पराभूत झालेला केविन कॉर्डनही याच गटाचा भाग होता.
पण आता केविनने दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून आपले नाव मागे घेतले आहे. केविन कार्डनला डाव्या कोपराला दुखापत झाली.
केविनने स्पर्धेतून नाव मागे घेताच लक्ष्य सेनचा विजय 'अवैध' ठरला. ग्वाटेमालाच्या खेळाडूने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारतीय बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनचा केविन कॉर्डनविरुद्धचा विजय गणला जाणार नाही, असे बॅडमिंटन जागतिक महासंघाने जाहीर केले.
बॅडमिंटन फेडरेशनने एक निवदेन जारी करताना सांगितले की, "ग्वाटेमालाचा पुरुष एकेरी खेळाडू केव्हिन कार्डनने डाव्या कोपराच्या दुखापतीमुळे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील बॅडमिंटन स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे." आता लक्ष्यला त्याच्या गटातील सर्व खेळाडूंपेक्षा एक सामना जास्त खेळावा लागणार आहे. आता गटातील सर्व खेळाडू प्रत्येकी २ सामने खेळणार आहेत, मात्र लक्ष्यने याआधीच एक सामना खेळला आहे.
केव्हीन कार्डने माघार घेतल्यानंतर आता बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या ग्रुप-एलमध्ये लक्ष्य सेन, इंडोनेशियाचा क्रिस्टी जोनाथन आणि बेल्जियमचा कॅरागी ज्युलियन उरले आहेत.
लक्ष्यचा पुढील सामना सोमवार (२९ जुलै) रोजी कॅरागी ज्युलियनशी होईल आणि त्यानंतर त्याचा शेवटचा सामना बुधवारी (३१ जुलै) क्रिस्टी जोनाथनशी होईल.
संबंधित बातम्या