पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये शनिवारी (७ सप्टेंबर) पुरुषांच्या भालाफेक F41 फायनलमध्ये इराणच्या बेट सयाह सदेघ याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे भारताच्या नवदीप सिंग याला सुवर्णपदक मिळाले. विशेष म्हणजे, नवदीप सिंगने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते, पण त्याच्या रौप्य पदकाचे सुवर्णात रूपांतर झाले.
पुरुषांच्या भालाफेक F41 प्रकारातील हे भारताचे पहिले सुवर्णपदक आहे. यासह भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत ७ सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताने कोणत्याही पॅरालिम्पिकमध्ये इतके सुवर्ण जिंकले नव्हते.
नवदीप सिंगचे दुसऱ्या फेरीत जोरदार पुनरागमन
नवदीपचा पहिला प्रयत्न फाऊल झाला होता, पण त्याने दुसऱ्या प्रयत्नात ४६.३९ मीटर फेकत शानदार पुनरागमन केले. तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या नवदीपच्या तिसऱ्या थ्रोने संपूर्ण स्टेडियमला रोमांचित केले.
त्याने ४७.३२ मीटरचा थ्रो करून पॅरालिम्पिकचा विक्रम मोडला आणि आघाडी घेतली. सदेघ याने मात्र पाचव्या प्रयत्नात भारतीय खेळाडूला मागे टाकत ४७.६४ मीटरचा विक्रमी थ्रो नोंदवला.
या कारणामुळे इराणचा बेट सयाह सदेघ अपात्र ठरला
दरम्यान, भालाफेकची फायनल संपल्यानंतर लगेचच इराणचा खेळाडू बेट सयाह सदेघ याला अपात्र ठरवण्यात आले. यामुळे नवदीपला अव्वल स्थान मिळाले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.
इराणी खेळाडूला अपात्र का ठरवण्यात आले, याबाबत स्पष्टपणे काही सांगण्यात आलेले नाही. पण खेळाडूने लाल रंगात अरबी मजकूर असलेला काळा झेंडा दाखवला होता.
वारंवार हा आक्षेपार्ह ध्वज प्रदर्शित केल्याबद्दल इराणी खेळाडूला अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला सुवर्णपदक गमवावे लागले.
आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे नियम क्रीडापटूंना कार्यक्रमात कोणत्याही राजकीय गोष्टी, किंवा कृती करण्यापासून प्रतिबंधित करतात आणि बेट सयाह सदेघ याला याच अयोग्य वर्तनासाठी अपात्र ठरवण्यात आले.
या स्पर्धेचे रौप्य पदक चीनच्या सन पेंग्झियांग (४४.७२) या विश्वविक्रमधारकाला मिळाले, तर इराकच्या नुखैलावी वाइल्डन (४०.४६) याने कांस्यपदक जिंकले. F41 श्रेणी ही उंची कमी असलेल्या खेळाडूंसाठी आहे.
नवदीप सिंगहा आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. २०१७ मध्ये खेळात आल्यापासून राष्ट्रीय स्तरावर ५ वेळा पदके जिंकली आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला पॅरा-वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते.