पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्ताचा अर्शद नदीम यांनी भालाफेकीत वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूने सुवर्णपदक पटकावले तर नीरज चोप्राने दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक पटकावले. यानंतर या दोघांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांबद्दल बोलताना दिसत आहेत.
आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांना विचारण्यात आले होते, की जर त्यांच्या जीवनावर बायोपिक बनवला गेला तर कोणता अभिनेता मुख्य भुमिकेत असावा?
मुलाखत घेणाऱ्याने सर्वप्रथम नीरजला विचारले की, अर्शद नदीमवर बायोपिक निघाला तर त्यात कोणता हिरो असावा? यावर उत्तर देताना नीरज म्हणाला, तो (नदीम) खूप उंच आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यासाठी योग्य असतील असे मला वाटते.
यानंतर, नदीमला जेव्हा नीरजच्या बायोपिकमध्ये हिरो कोण असावा, हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा काही वेळ विचार केल्यानंतर त्याने उत्तर दिले की, शाहरुख खान.
दरम्यान, नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकता आले नाही. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. यावेळी मात्र नदीमने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाला फेकून इतिहास रचला. एवढ्या अंतरावर ऑलिम्पिकमध्ये कोणीच भाला फेकला नव्हता. म्हणजेच नदीमने विश्वविक्रम करत सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे, नीरजने ८९.४५ मीटर (त्याच्या मोसमातील सर्वोत्तम थ्रो) फेकून रौप्यपदक जिंकले. रौप्यपदक असूनही तो निराश दिसत होता. दुखापतीकडे बोट दाखवत तो म्हणाला, पदक आले आहे, तिरंगा माझ्या हातात आहे, याचा मला आनंद आहे. बरेच काम करायचे बाकी आहे. बराच काळ दुखापतीशी झुंजत होतो".
भारताने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेचा शेवट ६ पदकांसह केला, ज्यात नेमबाजीतील ३ (सर्व कांस्य पदके) आणि पुरुष हॉकी (कांस्य पदक), कुस्ती (कांस्य पदक) आणि भालाफेक (रौप्य) यातील प्रत्येकी १ पदकांचा समावेश आहे.
भारताला अनेक खेळांमध्ये पदके मिळाली असती. शटलर लक्ष्य सेनसह अनेक खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले, तर कुस्तीमध्ये विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचूनही पदकापर्यंत पोहोचू शकली नाही. ही पदके आली असती तर ही संख्या १० च्या वर जाऊ शकली असती.