पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने शुक्रवारी (९ ऑगस्ट) आणखी एक पदक जिंकले. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने ५७ किलो गटातील कुस्तीमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. अमन सेहरावतने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा पराभव केला. अमनने हा सामना १३-५ असा जिंकला.
संपूर्ण सामन्यात अमन सेहरावत याने आपला दबदबा कायम राखला. यासह भारताने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदके जिंकली आहेत. यातील ५ कांस्य आणि १ रौप्य पदक आहे.
या ऑलिम्पिकधील भारताचे कुस्तीतील हे पहिले पदक आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पहिले पदक मिळवून देणारा अमन सेहरावत कोण आहे? हे जाणून घेऊया.
अमन सेहरावत हा मूळचा हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बेरोहर गावचा आहे. तो सुरुवातीला गावातच मातीच्या कुस्तीत भाग घ्यायचा. २०१२ च्या ऑलिंपिकमध्ये सुशील कुमारने रौप्य पदक जिंकले होते, याने प्रेरित होऊन अमनने वयाच्या १० व्या वर्षी उत्तर दिल्लीतील छत्रसाल तालमीत प्रवेश घेतला. या दरम्यान तो ११ वर्षांचा असताना त्याचे दोन्ही पालक वेगवेगळ्या कारणांमुळे मरण पावले.
अमन सेहरावतने २०२१ मध्ये पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. तो प्रशिक्षक ललित कुमार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेत असे. २०२२ मधील अंडर-२३ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकानंतर, सेहरावत २३ वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
२०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने ५७ किलो गटात कांस्यपदक जिंकले. एप्रिल २०२३ मध्ये, त्याने अस्ताना येथे २०२३ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
यानंतर जानेवारी २०२४ मध्ये अमनने झाग्रेब खुल्या कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो गटात तांत्रिक श्रेष्ठतेने त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सेहरावतने इस्तंबूल येथे २०२४ च्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेतला आणि २०२४ पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताला कोटा स्थान मिळवून दिले.
विशेष म्हणजे टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया याच्याऐवजी २०२४ ऑलिंपिकसाठी WFI ने अमनची निवड केली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू आहे.