PV Sindhu to get married : भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू व दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू या महिन्याच्या अखेरीस आयुष्याच्या नव्या कोर्टवर पाऊल ठेवणार आहे. येत्या २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये उद्योजक व्यंकट दत्ता साई यांच्यासोबत ती विवाह विवाहबंधनात अडकणार आहे.
सिंधूचे वडील पीव्ही रमन्ना यांनी पीटीआयला या संदर्भात माहिती दिली. अवघ्या महिनाभरापूर्वीच दोघांनी एकमेकांना पसंत केलं. सिंधू जानेवारीपासून २०२५ च्या हंगामाची सुरुवात करत असल्यानं या महिन्यातच लग्न व्हावं अशी कुटुंबीयांची इच्छा होती. दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती, पण लग्नाबद्दल महिनाभरापूर्वीच सर्व काही ठरलं. लग्नानंतर २४ डिसेंबरला हैदराबादमध्ये स्वागत समारंभाचा सोहळा होणार आहे. पुढील हंगाम महत्त्वाचा ठरणार असल्यानं ती लवकरच सरावाला सुरुवात करेल, असंही त्यांनी सांगितलं.
सिंधूचे भावी पती व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. महिनाभरापूर्वीच त्यांच्या कंपनीच्या नवीन बोधचिन्हाचं सिंधूच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं. साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव यांचे चिरंजीव आहेत.
व्यंकट साई यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल आर्ट्स अँड सायन्सेस/लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर २०१८ मध्ये फ्लेम युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमधून बीबीए अकाउंटिंग आणि फायनान्स पूर्ण केलं आणि त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
व्यंकट साई यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी डिसेंबर २०१९ पासून पोसिडेक्समध्ये सुरुवात करण्यापूर्वी जेएसडब्ल्यू आणि नंतर सॉर अॅपल अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं होतं.
व्यंकट दत्ता साईंच्या एकूण संपत्तीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारण ते आतापर्यंतचा मोठा काळ नोकरदाराच्या भूमिकेत होते. ते स्वतःची ओळख एन्जल इव्हेस्टर अशी करून देतात. मात्र, त्यांच्या निव्वळ संपत्तीबद्दल जास्त माहिती ऑनलाइन उपलब्ध नाही. मात्र, फोर्ब्सच्या मते, डिसेंबर २०२३ पर्यंत पीव्ही सिंधूची एकूण संपत्ती ७.१ दशलक्ष यूएस डॉलर होती. भारतीय चलनात ती अंदाजे ५९ कोटी रुपये आहे.
व्यंकट दत्ता साईचा आयपीएलशी संबंध कोणत्याही संघातील खेळाडू किंवा कोणत्याही सपोर्ट स्टाफचा सदस्य म्हणून नव्हता, परंतु त्यांनी संघाचं व्यवस्थापन केलं आहे. ही टीम दिल्ली कॅपिटल्स असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी JSW ग्रुपसोबत काम केल्याचं लिंक्डइनवर म्हटलं आहे. ही कंपनी दिल्ली कॅपिटल्सची सह-मालक आहे.
'आयपीएल संघाच्या व्यवस्थापनाचा माझ्या वित्त आणि अर्थशास्त्रातील बीबीए पदवी संबंध तसा खूपच कमी आहे, परंतु या दोन्ही अनुभवांमधून मी बरंच काही शिकलो आहे, असं त्यांनी स्वत:च्या बायोमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या