गेल्या दोन दिवसांपासून विनेश फोगटच्या अपात्रतेच्या बातमीने कोट्यवधी भारतीय दु:खी झाले आहेत. अवघे १०० ग्रॅम वजन जास्त आढळल्याने विनेशला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले.
पण आता भारताच्या आणखी एका कुस्तीपटूचे असेच प्रकरण समोर आले आहे. शिवानी पवार असे या कुस्तीपटूचे नाव आहे. शिवानी पवार पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्यापासून वंचित राहिली. जर सर्वकाही बरोबर झाले असते तर शिवानी पवार ही ५० किलो वजनी गटात विनेश फोगटच्या दिसली असती, पण तिची चर्चाच झाली नाही हे तिचे दुर्दैव.
खरं तर, भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या काही महिन्यांपूर्वी कुस्तीच्या ट्रायल घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा केली होती. या घोषणेने मध्य प्रदेशच्या शिवानी पवार हिच्यासह भारतातील अनेक पैलवानांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. २३ वर्षांखालील कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी शिवानी ही भारतातील पहिली कुस्तीपटू होती.
२०२० टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहिया आणि जागतिक क्रमांक १ सरिता मोर यांच्यासह मिळून शिवानीने ट्रायल न घेण्याच्या WFI च्या निर्णयाला आव्हान दिले होते.
शिवानी पवार अनेक अडचणींवर मात करत इतक्या मोठ्या या स्तरावर पोहोचली आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिच्याकडे प्रशिक्षणासाठी पैसे नव्हते आणि ती कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैसे कमवत असे. लाख अडचणी असूनही, ती नंतर तिच्या कुटुंबाच्या पाठिंब्याने राष्ट्रीय चॅम्पियन बनली.
ऑलिम्पिक कोटा मिळालेल्या कुस्तीपटूला पराभूत केल्यानंतर शिवानीला खात्री होती, की तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नक्कीच सहभागी होण्याची संधी मिळेल, परंतु WFIने ट्रायल न घेतल्याने तिचे स्वप्न भंगले. पण या गोष्टीची विनेश फोगटइतकी चर्चाच झाली नाही.