मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Who is Rajvardhan Hangargekar : तुळजापूरचा राजवर्धन हंगरगेकर आहे तरी कोण? धोनीसोबत आयपीएल खेळतोय

Who is Rajvardhan Hangargekar : तुळजापूरचा राजवर्धन हंगरगेकर आहे तरी कोण? धोनीसोबत आयपीएल खेळतोय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 01, 2023 11:27 AM IST

Who is Rajvardhan Hangargekar, MS Dhoni : राजवर्धन हंगरगेकरने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या ४ षटकांत ३६ धावा देत ३ महत्वाचे फलंदाज बाद केले.

Who is Rajvardhan Hangargekar
Who is Rajvardhan Hangargekar

IPL 2023 GT Vs CSK Highlights : आयपीएल 2023 चा थरार सुरू झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरुवात झाली. हा सामना गुजरात संघाने आपल्या नावावर केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ७ गडी गमावून १७८ धावा केल्या, प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने ४ चेंडू राखून लक्ष्य गाठले. गुजरातने ५ विकेट्ने हा सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूची प्रचंड चर्चा रंगली आहे. हा खेळाडू भारताच्या अंडर १९ वर्ल्डकप संघाचाही भाग राहिला आहे. राजवर्धन हंगरगेकर असे या युवा स्टार खेळाडूचे नाव आहे. २० वर्षीय राजवर्धन हा धाराशीवच्या तुळजापूरचा रहिवासी आहे.

राजवर्धन हंगरेकरने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या ४ षटकांत ३६ धावा देत ३ महत्वाचे फलंदाज बाद केले. हंगरगेकरने त्याच्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वृद्धिमान साहाची विकेट घेत सीएसकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर त्याने साई सुदर्शन आणि विजय शंकर यांची शिकार केली. पदार्पणाच्या सामन्यात हंगरगेकरने तीन विकेट घेत आपली क्षमता सिद्ध केली.

२०२२ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावादरम्यान हंगरगेकरला सीएसकेने १.५० कोटी रुपयांना विकत घेतले, त्याची बेस प्राइस ३० लाख रुपये होती.

कोण आहे राजवर्धन हंगरगेकर

२० वर्षीय राजवर्धन हंगरगेकर तुळजापुरचे माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात पोहोचला. मात्र, त्याचे मन क्रिकेटमध्ये रमले. त्याने पुण्यातच प्रचंड मेहनत घेतली. कसून सराव केला याच जोरावर त्याने भारताच्या अंडर १९ संघात एन्ट्री केली. ऑलराऊंडर असलेल्या राजवर्धनने अंडर-19 संघात शानदार कामगिरी करून प्रसिद्धी मिळवली. त्याची हार्दिक पांड्याशी तुलना केली जाते. राजवर्धन १४० च्या स्पीडने गोलंदाजी करू शकतो.

अंडर १९ वर्ल्डकपमधून चर्चेत आला

राजवर्धन त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण तो एकेकाळी ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचा. १४ वर्षांचा असताना त्याने वेगवान गोलंदाजी सुरू केली. धाराशीवसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर २०१६-१७ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली. तेथे चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला अंडर-१९ विश्वचषकासाठी निवडण्यात आले.

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत हंगरगेकरने ६ सामन्यात ५ बळी घेतले. या स्पर्धेत राजवर्धन हंगरगेकरने आयर्लंडविरुद्ध स्फोटक खेळी खेळली होती, ज्यात त्याने सलग तीन षटकार ठोकले. त्याच्या खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या हंगरगेकरने ४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १३ बळी घेतले आहेत. १३३ धावांत ६ बळी ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याने १३ लिस्ट ए सामन्यात २५ आणि ८ टी-20 सामन्यात ५ बळी घेतले आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या