रेल्वे अपघातात पाय गेला, नंतर IIT ची पदवी मिळवली, आता सुवर्णपदक जिंकलं! वाचा, नितेश कुमारचा थक्क करायला लावणारा संघर्ष-who is nitesh kumar iit graduate wins gold medal in paris paralympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रेल्वे अपघातात पाय गेला, नंतर IIT ची पदवी मिळवली, आता सुवर्णपदक जिंकलं! वाचा, नितेश कुमारचा थक्क करायला लावणारा संघर्ष

रेल्वे अपघातात पाय गेला, नंतर IIT ची पदवी मिळवली, आता सुवर्णपदक जिंकलं! वाचा, नितेश कुमारचा थक्क करायला लावणारा संघर्ष

Sep 02, 2024 09:18 PM IST

Who is Nitesh Kumar : नितेश कुमारने पदक जिंकल्याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची संख्या ९ झाली आहे. नितेशने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. याआधी अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.

Who is Nitesh Kumar : आयआयटीचा पदवीधर ते आता सुवर्णपदक विजेता, भारताचा नवा स्टार नितेश कुमार कोण आहे? वाचा
Who is Nitesh Kumar : आयआयटीचा पदवीधर ते आता सुवर्णपदक विजेता, भारताचा नवा स्टार नितेश कुमार कोण आहे? वाचा

भारताच्या नितेश कुमार याने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले. नितेश कुमारने सोमवारी (२ सप्टेंबर) बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या SL3 प्रकाराच्या अंतिम फेरीत ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

अव्वल मानांकित नितेशने तीन सामन्यांच्या चुरशीच्या लढतीत बेथेलचा २१-१४, १८-२१, २३-२१ अशा फरकाने पराभव केला. ला कॅपेले एरिना कोर्टवर नितेश आणि बेथेल यांच्यात चुरशीची लढत झाली. याआधी नितीश बेथेलविरुद्ध ९ सामने खेळले होते आणि यामध्ये त्याला कधीही जिंकण्यात यश आले नव्हते.

भारताला दुसरे सुवर्ण मिळाले

नितेश कुमारने पदक जिंकल्याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची संख्या ९ झाली आहे. नितेशने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. याआधी अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.

पहिला गेम संपायला ३१ मिनिटे लागली

दरम्यान, नितेश आणि बेथेल यांच्यातील अंतिम सामना खूपच रोमांचक झाला. नितीशने पहिल्या गेममध्ये बेथेलचा २१-१४ असा पराभव केला. या सामन्यात, दोन शटलर्समधील एक रॅली १२२ शॉट्सपर्यंत चालली. पहिला गेम संपायला ३१ मिनिटे लागली, यावेळी दोन्ही खेळाडू खूप थकलेले दिसत होते.

दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल केला. भारतीय शटलरने दडपणाखाली स्वतःला रोखून दमदार स्मॅश मारले आणि ब्रिटिश खेळाडूला चुका करण्यास भाग पाडले. तिसऱ्या गेममध्ये बेथेल चांगलाच निराश आणि तणावात दिसत होता, याचा फायदा घेत नितेशने सुवर्णपदक जिंकले.

कोण आहे नितेश कुमार?

२००९ मध्ये एका अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाल्याने नितीश कुमार याच्या आयुष्याने नाट्यमय वळण घेतले. या दुखापतीमुळे तो अनेक महिने अंथरुणाला खिळून होता. 

नितेश १५ वर्षांचा असताना विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात त्याने आपला पाय गमावला. मात्र, नितेश कुमारने हा धक्का आपल्यावर भारी पडू दिला नाही आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

नितेश कुमारने आयआयटीची तयारी केली आणि त्यात प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. नितेश कुमारने २०१३ मध्ये आयआयटी मंडीमध्ये प्रवेश घेतला. आयआयटीमध्ये शिकत असताना कुमारला बॅडमिंटनची आवड निर्माण झाली, तेच नंतर त्याचे ध्येय बनले.

नितेश सांगतो की, 'माझे बालपण थोडे वेगळे होते. मी फुटबॉल खेळायचो आणि मग हा अपघात झाला. मला खेळ कायमचा सोडावा लागला आणि अभ्यासाला सुरुवात केली. पण खेळ पुन्हा माझ्या आयुष्यात आला.

नितेशची पॅरा बॅडमिंटन कारकीर्द २०१६ मध्ये सुरू झाली

नितेश कुमारची पॅरा बॅडमिंटन कारकीर्द २०१६ मध्ये सुरू झाली. त्या वर्षी त्याची हरियाणा संघात निवड झाली. त्यानंतर कुमारने पॅरा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. यानंतर त्याने २०१७ मध्ये आयरिश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिले विजेतेपद जिंकले.

नितेश कुमारने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले

त्यानंतर नितेश कुमार आशियाई पॅरा गेम्स आणि BWF पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड सर्किटसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. नितेशने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ३ पदके जिंकली. त्याने २०१९ आणि २०२२ मध्ये रौप्य पदक आणि २०२४ मध्ये कांस्य पदक जिंकले. त्याचे यश आशियाई पॅरा गेम्समध्येही दिसून आले जेथे त्याने १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली.

नितेश कुमार सिनीयर बॅडमिंटन कोच

नितेश कुमार याची कामगिरी केवळ त्याच्या क्रीडा कारकीर्दीपुरती मर्यादित नाही. त्याने आयआयटी मंडीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय तो हरियाणातील क्रीडा आणि युवा घडामोडींमध्ये वरिष्ठ बॅडमिंटन प्रशिक्षकाची भूमिकाही बजावत आहे. नितीश कुमार याचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.