Neeraj Chopra Weds Himani Mor : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं हिमानी मोर हिच्या सोबत एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. नीरजनं स्वत: सोशल मीडिया अकाऊंटवर या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. नीरज चोप्राच्या लग्नाची साधी चर्चाही कुठं नसताना अचानक फोटो समोर आल्यानं हे सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. नीरजची पत्नी हिमानी मोर हिच्याबद्दल लोक माहिती घेत आहेत.
स्पोर्टस्टारनं दिलेल्या माहितीनुसार, नीरजची पत्नी हिमानी हरियाणातील (Haryana) लारसौली इथली रहिवाशी असून तिचं शालेय शिक्षण पानिपतच्या लिटिल एन्जल्स स्कूलमध्ये झालं आहे. शिक्षणासाठी परदेशात स्थायिक होण्यापूर्वी तिनं दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयात पदवी पूर्ण केली.
सध्या हिमानी मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून स्पोर्ट्स मॅनेजमेंट अँड अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स इन सायन्स करत आहे. तिनं साऊथईस्टर्न लुईझियाना युनिव्हर्सिटीमध्येही शिक्षण घेतलं आहे. टेनिसपटू म्हणून तिनं फ्रँकलिन पियर्स विद्यापीठात अर्धवेळ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. सध्या ती एमहर्स्ट कॉलेजचा टेनिस संघ सांभाळते. तिथं ती ग्रॅज्युएट असिस्टंट आहे.
नीरज चोप्रा यानं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून लग्नाची घोषणा केली. ‘मी माझ्या कुटुंबाच्या साक्षीनं माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू केला. आम्हाला एकत्र आणणाऱ्या व आशीर्वाद देणाऱ्या प्रत्येकाचा आभारी आहे. प्रेमाचे हे बंध निरंतर आनंद देतील,’ असं म्हणत नीरज चोप्रा यानं लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
गेल्या वर्षी एका वैयक्तिक स्पर्धेत दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारा नीरज चोप्रा हा स्वातंत्र्योत्तर भारतातील दुसरा पुरुष खेळाडू ठरला होता. ऑलिम्पिकमध्ये दोन वेगवेगळी पदकं (टोकियो २०२० मध्ये सुवर्ण आणि पॅरिस २०२४ मध्ये रौप्य) मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
नीरज चोप्रा याचे काका भीम यांनी पीटीआयला लग्नासंदर्भात माहिती दिली. 'हा विवाह सोहळा दोन दिवसांपूर्वी भारतातच झाला असून जोडपं हनीमूनसाठी रवाना झालं आहे. ते कुठं गेले आहेत माहीत नाही. आम्हाला याची फार चर्चा करायची नाही, असं भीम यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या