मोना अग्रवालने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले. तिने शुक्रवारी (३० ऑगस्ट) महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH1) स्पर्धेत ही कामगिरी केली. मोनाने अंतिम फेरीत २२८.७ गुण मिळवून तिचे पहिले पॅरालिम्पिक पदक जिंकले. २६ वर्षीय मोनाने अल्पावधीतच शूटिंगमध्ये आपला ठसा उमटवला.
डिसेंबर २०२१ मध्ये तिने शूटिंगला सुरुवात केली होती. तिने २०२४ मध्ये पहिले विश्वचषक सुवर्णपदक जिंकले आणि पॅरालिम्पिक प्रवेश मिळवला.
राजस्थानच्या सीकरमध्ये जन्मलेल्या मोनाला वयाच्या ९ महिन्यांत पोलिओ विषाणूची लागण झाली होती, ज्यामुळे तिच्या दोन्ही पायांवर परिणाम झाला. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने स्वतंत्र जीवन जगण्यासाठी घर सोडले. अनेक शारीरिक आव्हाने असूनही तिने एचआर आणि मार्केटिंगमध्ये काम केले. २०१६ मध्ये तिने पॅरा ॲथलेटिक्सकडे आपले लक्ष वळवले. थ्रो इव्हेंटमध्ये राज्यासाठी पदार्पण केले आणि या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली.
मोना अग्रवालने राज्यस्तरीय पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्येही भाग घेतला आणि अनेक पदके जिंकली. याशिवाय तिने सिटिंग व्हॉलीबॉलमध्येही चमकदार कामगिरी केली. कर्णधार म्हणून तिने २०१९ मध्ये पहिल्या महिला राष्ट्रीय बैठ्या व्हॉलीबॉल स्पर्धेत राजस्थानला सुवर्णपदक मिळवून दिले. यानंतर तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, मात्र प्रेग्नेंसीमुळे ती यात सहभागी होऊ शकली नाही.
डिसेंबर २०२१ मध्ये मोनाने वैयक्तिक खेळ करण्याचा निर्णय घेतला आणि रायफल नेमबाजीची निवड केली. २०२२ मध्ये तिने राष्ट्रीय रौप्यपदक जिंकले. २०२३ च्या मध्यापर्यंत तिने तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विश्वचषकात मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहावे स्थान मिळवले होते.
तिच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मोनाने सुवर्णपदक जिंकले. यासह पॅरालिम्पिक कोटा गाठला आणि एक नवा आशियाई विक्रम झाला.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल SH1 व्यतिरिक्त, ती पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या ५०m रायफल ३ पोझिशन SH1 आणि मिश्रित ५०m रायफल प्रोन SH1 इव्हेंटमध्ये देखील सहभागी होईल.
SH1 म्हणजे स्क्वेअर रायफल. यामध्ये अशा लोकांचा समावेश होतो ज्यांना त्यांच्या कमरेपासून खालच्या अवयवांमध्ये समस्या आहेत, जसे की अर्धांगवायू. परंतु अशा खेळाडूंकडे कोणतीही अडचण न येता बंदूक धरून उभे राहून किंवा बसलेल्या स्थितीतून शूट करण्याची क्षमता असली पाहिजे.