बुद्धीबळ स्पर्धेत रविवारी (२२ सप्टेंबर) भारताने इतिहास रचला. पुरूष संघानंतर आता भारताच्या महिला संघानेही बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. बुडापेस्ट येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
भारताच्या विजयी महिला संघात हरिका द्रोणवल्ली, वैशाली रमेशबाबू, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, तानिया सचदेव यांचा समावेश आहे.
दरम्यान मराठमोळी दिव्या देशमुख ही नागपूरची आहे. १८ वर्षीय दिव्या गेल्या काही वर्षांपासून बुद्धिबळातील एक उगवताी स्टार आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने बुद्धिबळाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
पण आधी तिने बॅडमिंटनमध्ये आपले करिअर करावे अशी तिच्या पालकांची इच्छा होती, परंतु कमी उंची कमी असल्यामुळे तिने बुद्धिबळातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
दिव्याला बुद्धिबळाची आवड तिच्या वडिलांमुळे निर्माण झाली. ते छंद म्हणून बुद्धीबळ खेळत असत. दिव्याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी या खेळात पहिले पारितोषिक पटकावले होते.
दिव्याने तिच्या कारकिर्दीत खूप यश मिळवले आहे. तिने २०२२ मध्ये महिला बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर पुढील वर्षी आशियाई स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. याशिवाय आंतरराष्ट्रीय मास्टर आणि महिला ग्रँडमास्टर दिव्या अंडर-२० विश्वचषक स्पर्धेत ज्युनियर चॅम्पियन ठरली आहे. त्या स्पर्धेत तिने ११ पैकी नऊ सामने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित ठेवले.
यावर्षी अंडर-२० गर्ल्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली
यानंतर दिव्याने या वर्षी जूनमध्ये FIDE ज्युनियर अंडर-२० गर्ल्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली होती. ही स्पर्धा गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ४४ विविध देशांतील बुद्धिबळ संघटनांच्या सुमारे २३० खेळाडूंनी भाग घेतला होता.
कोनेरू हंपी, हरिका द्रोणवल्ली आणि सौम्या स्वामीनाथन यांच्यानंतर FIDE अंडर-२० वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकणारी दिव्या ही चौथी भारतीय महिला ठरली.
दरम्यान, याआधी २०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले होते. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी अझरबैजानचा ३.५-०.५ असा पराभव करून देशासाठी सुवर्णपदक जिंकले.
डी हरिकाने पहिल्या बोर्डावर तांत्रिक श्रेष्ठत्व दाखवले आणि दिव्या देशमुखने पुन्हा एकदा तिच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत तिसऱ्या बोर्डवर वैयक्तिक सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. आर वैशालीच्या ड्रॉनंतर वंतिका अग्रवालच्या नेत्रदीपक विजयाने भारतीय संघाचे सुवर्णपदक निश्चित केले.
यापूर्वी पुरुष संघानेही सुवर्णपदक पटकावले होते. संघाने खुल्या गटात सुवर्ण जिंकून इतिहास रचला. भारतीय पुरुष संघात गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन इरिगाईसी, विदित गुजराती, पंतला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन (कर्णधार) यांचा समावेश होता.
या स्पर्धेतील भारतीय पुरुष संघाचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी भारताने २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. ही स्पर्धा मायदेशातच आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी २०१४ मध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकले होते.