डोम्माराजू गुकेश बुद्धीबळाच्या पटलावरील नवा राजा बनला आहे. गुकेशने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनून इतिहास रचला आहे. चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून तो इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
याच वर्षी त्याने कँडीडेट्स टुर्नामेंट जिंकण्याबरोबरच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला होता.
गुकेशने बुद्धिबळाच्या जगतात आपल्या देशाला गौरव मिळवून दिले आहे, पण या युवा स्टारच्या करिअरची सुरुवात कशी झाली? हे तुम्हाला माहीत आहे का?
डी गुकेश याचा जन्म २९ मे २००६ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रजनीकांत असून ते व्यवसायाने नाक, कान आणि घसा तज्ञ डॉक्टर आहेत. त्याची आई पद्मा या देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि सूक्ष्मजीवशास्त्र स्पेशलिस्ट आहेत.
गुकेश तेलगू भाषिक कुटुंबातील असून वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी त्याने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. तो आठवड्यातून तीन दिवस बुद्धिबळासाठी प्रत्येकी एक तास देत असे. आपल्या बुद्धिबळ शिक्षकांना प्रभावित केल्यानंतर, तो आठवड्याच्या शेवटी बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला.
डी गुकेशने २०१५ मध्ये पहिली चॅम्पियनशिप जिंकली. त्याने वयाच्या ९ व्या वर्षी अंडर-९ आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तीन वर्षांनंतर, त्याने १२ वर्षांखालील स्तरावर जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
२०१८ च्या आशियाई युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्याने एक, दोन नव्हे तर ५ सुवर्णपदके जिंकली. मार्च २०१७ मध्ये, आंतरराष्ट्रीय मास्टर टूर्नामेंट जिंकून तो इतिहासातील तिसरा सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँड मास्टर बनला.
२०२३ मध्ये, गुकेश विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू बनला. आनंद ३७ वर्षे भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू राहिला. आपला उज्ज्वल प्रवास सुरू ठेवत, तो २०२४ मध्ये कँडीडेट्स टुर्नामेंट जिंकणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
विश्वनाथन आनंद याच्यानंतर विश्व बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश हा दुसरा भारतीय आहे. एकूण चार वेळा विश्वविजेता होण्याचा मान आनंदला मिळाला होता.
संबंधित बातम्या