भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला. अवनीने (३०ऑगस्ट) पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले आहे. तिने महिला स्टँडिंग १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
अवनी लेखरा हिने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते, पण तिचा ऐतिहासिक प्रवास अजिबात सोपा नव्हता. फार कमी लोकांना माहित असेल, की वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी अवनीला अर्धांगवायू झाला होता, त्यानंतर तिचे आयुष्य प्रचंड संघर्षमय बनले.
अवनी लेखरा हिचा जन्म ८ नोव्हेंबर २००१ रोजी जयपूर येथे झाला. सर्व काही ठीक चालले होते पण २०१२ मध्ये अवनीसोबत एक घटना घडली, ज्यामुळे तिच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. २०१२ मध्ये कार अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. अवनीने लहान वयातच आलेल्या या कठीण प्रसंगाला मोठ्या हिमतीने तोंड दिले आणि यशाकडे वाटचाल केली.
अवनी लेखरा हिने नेमबाजीच्या SH1 प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. SH1 श्रेणी म्हणजे ज्या खेळाडूंचे हात नीट हलू शकत नाहीत आणि पाठीचा खालचा भाग नीट हलू शकत नाही. किंवा त्यांच्या पायांच्या हालचालीत समस्या आहेत.
२००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अभिनव बिंद्रापासून प्रेरणा घेऊन तिने २०१५ मध्ये नेमबाजी प्रोफेशन म्हणून निवडले. खरं तर अवनीच्या वडिलांनीच आपल्या मुलीला खेळासाठी प्रोत्साहन दिलं.
अवनी लेखराच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, तिने राजस्थान विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक नेमबाजीतही तिने कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवर जागतिक विक्रम केले आहेत. अवनीला तिच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
अवनी लेखरा वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. तेथे तिने अंतिम फेरीत २४९.६ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅरालिम्पिकचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये अवनीने २४९.७ गुण मिळवत स्वतःचा विक्रम सुधारत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
अवनी लेखरा आता सलग दोन पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे. तिच्याआधी, आजपर्यंत भारताच्या एकाही नेमबाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.