Major Dhyan Chand : हॉकीच्या जादूगारानं हिटलरची ती ऑफर का नाकारली? कारण ऐकून ध्यानचंद यांना कडक सॅल्यूट ठोकाल!
National Sports Day, Major Dhyan Chand jayanti : मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित झालेला जर्मनीचा हुकूमशहा हिटरलने त्यांना मोठी ऑफर दिली होती. लष्करात मोठ्या पदाच्या बदल्यात जर्मनीकडून हॉकी खेळण्याची ही ऑफर होती.
National Sports Day: हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि याच खेळाचा जादूगार मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांची उद्या (२९ ऑगस्ट) जंयती आहे. हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती (dhyan chand birth anniversary) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते. हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ध्यानचंद यांना ओळखलं जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या हॉकी संघाने १९२८ ते १९३६ अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.
ट्रेंडिंग न्यूज
मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल अनेक गोष्टींची चर्चा होते. त्यात त्यांना हिटलरने दिलेली ऑफर आणि ध्यानचंद यांनी ती धुडकावून लावल्याची चर्चा सर्वाधिक होते.
हिटलरने दिली जर्मनीकडून हॉकी खेळण्याची ऑफर
मेजर ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित झालेला जर्मनीचा हुकूमशहा हिटरलने त्यांना मोठी ऑफर दिली होती. लष्करात मोठ्या पदाच्या बदल्यात जर्मनीकडून हॉकी खेळण्याची ही ऑफर होती. भारतीय संघाचे नेतृत्व करणारे मेजर ध्यानचंद हे तेव्हा भारताच्या लष्करात लान्स नायक म्हणून कार्यरत होते. भारतीय सैन्यातले हे फारसे मोठे पद नव्हते. पण तरीही हिटलरने दिलेली ती ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे आणि नम्रतेनं नाकारली.
ध्याचंद यांनी नम्रपणे ऑफर नाकारली
ध्यानचंद यांनी ती ऑफर नाकराने सांगितले होते की," मी भारताचे मीठ खाल्ले आहे, त्यामुळे कायम भारतासाठीच खेळेन." ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमार हेदेखील हॉकी खेळाडू होते. त्यांच्या खेळामुळेच भारताने १९७५ मध्ये पाकिस्तानला पराभूत करत हॉकीचा वर्ल्ड कप जिंकला होता.
ध्यानचंद यांचे मूळ नाव ध्यान सिंग होते
ध्यानचंद यांचे मुळ नाव ध्यान सिंग असे होते. पण हॉकीचा सराव ते रात्री उशिरापर्यंत करायचे. यामुळेच त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा दिली आणि त्यांचे ध्यानचंद हे नाव प्रसिद्ध झाले.
मेजर ध्यानचंद हॉकीचा जादूगार
१९२८ च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत मेजर ध्यानचंद यांनी तब्बल १४ गोल केले होते. तेव्हा भारतीय संघाच्या विजयाची बातमी लिहिताना हॉकी खेळ नाही तर जादू आहे आणि मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादूगर आहेत असे लिहिले होते. दिग्गज क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांनी असं म्हटलं होतं की, क्रिकेटमध्ये जशा धावा करतात तसे ध्यानचंद गोल करायचे.
हॉकी स्टिकमध्ये चुंबक असल्याचा संशय
ध्यानचंद यांच्या खेळावर एकदा नेदरलँडच्या हॉकी अथॉरिटीने शंका घेतली होती. त्यांनी अनेकदा हॉकी स्टिक बदलायला लावली. इतकंच काय तर ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे का हे तपासण्यासाठी हॉकी स्टिकचे तुकडेही करून पाहिले होते.
खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंद यांचे नाव
मेजर ध्यानचंद यांना भारत सरकारने १९५६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं होतं. त्यांनी ३ डिसेंबर १९७९ रोजी अखेरचा श्वास घेतला. मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जातेय. यासाठी शिफारस केल्याचं माजी गृहराज्यमंत्री किरण रिजुजु यांनी म्हटलं होतं. पण अद्याप तरी पुरस्काराची घोषणा झालेली नाही. दरम्यान, खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्याची घोषणा गेल्या वर्षी केली गेली. क्रीडा दिनी हा पुरस्कार याआधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून दिला जात असे.